Tuesday, January 03, 2023

रिसर्च पेपर्सचे कारखाने!

 Source: https://maharashtratimes.com/editorial/article/iit-roorkee-launches-project-to-develop-advanced-packaging-research-laboratory/articleshow/96695124.cms

पेपर मिलच्या अनैतिक प्रथेच्या उच्चाटनासाठी जगभरातून प्रयत्न चालू आहेत. भारतात संशोधनातील फसवणूक ओळखण्यास सक्षम तज्ज्ञ तयार करण्यासाठी नवीन प्रशिक्षण व जागरूकता कार्यक्रम युद्धपातळीवर आवश्यक आहेत.

 डॉ. शुभदा नगरकर

खरे तर मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हाच संशोधनाचा मुख्य उद्देश; परंतु पदोन्नतीसाठी संशोधन अनिवार्य केल्यानंतर ते करण्यापासून ते त्याच्या प्रकाशनापर्यंतचे चित्रच पालटले. लवकरात लवकर संशोधन उरकणे व ते छापण्यासाठी वाङ्मयचौर्य केलेले बोगस पेपर बनावट जर्नलमध्ये छापण्यास सुरवात झाली. अशा बनावट जर्नल्सना आळा घालण्याचे काम सध्या सुरू आहे. बनावट पेपर लिहिण्यापेक्षा तयार पेपर दर्जेदार जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्याची संशोधाकांची गरज लक्षात घेऊन 'रिसर्च पेपर मिल्स' अस्तित्वात आल्या. संशोधनातील भ्रष्टाचाराचा हा एक पुढचा टप्पा! उत्तम संशोधन करणारे संशोधक मात्र या सर्वांपासून दूरच असतात.

या 'रिसर्च पेपर मिल्स' काय आहेत, त्या कोण चालवतात आणि त्यांची कार्यपद्धती कशी आहे?

साठच्या दशकात जगभरात, विशेषत: अमेरिकेत 'टर्म पेपर मिल्स' अस्तित्वात आल्या. तेथील कॉलेजात पदवीसाठी 'टर्म पेपर' लिहावा लागतो. ते खूप कष्टप्रद असते. ग्रंथालयात जाणे, अनेक संदर्भ ग्रंथ व इतर साहित्य वाचणे, टिपण तयार करणे याचा मुलांना कंटाळा येत असल्याने याचा फायदा घेऊन काही कंपन्या कामाला लागल्या. त्या भरपूर पैसे घेऊन टर्म पेपर्स तयार करू लागल्या. मग पुढे 'एसे (निबंध) मिल्स', 'पीएचडी थिसीस मिल्स', 'प्रकल्प मिल्स' असे कारखाने तयार झाले. त्यात आता रिसर्च पेपर कारखान्यांची भर पडते आहे. इंटरनेटमुळे मागणीदार आणि पुरवठा करणाऱ्यांचे काम सोपेच झाले आहे. अशा पेपर मिल्स भूछत्रासारख्या जगभर मोठ्या संख्यने उगवल्या.

ब्रिटनमधील 'रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री' प्रकाशित करत असलेल्या आर. एस. सी. ॲडव्हान्सेस या जर्नलमधून २०२१ मध्ये ६८ पेपर्स मागे घेतले गेले. याचे मुख्य कारण म्हणजे ते 'पेपर मिल्स'च्या मदतीने तयार केले होते. त्यामुळे हा विषय जास्त चर्चिला गेला. तपासणीअंती असे दिसले, की या सर्व पेपर्समधील बराचसा मजकूर, तक्ते आणि छायाचित्रे यांची एक सारखीच होती. अमेरिकेतील संशोधनातील सत्यता तपासणाऱ्या तज्ज्ञ एलिझाबेथ बिक यांच्या मते, चीनमधील डॉक्टर्स रिसर्च पेपर मिल्सचा वापर मोठ्या प्रमाणात करतात; कारण त्यांच्याकडे संशोधनाला वेळच नसतो. अत्यंत घाईगडबडीत त्यांना पेपर्स प्रकाशित करायचे असतात.

बनावट टर्म किंवा रिसर्च पेपर्स तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत.

- तज्ज्ञ (?) व्यक्तींकडून लिहून घेणे.

- कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित संगणक प्रणालीचा वापर करणे.

इतर तज्ज्ञांच्या मते काही व्यक्ती प्रकाशित पेपर्समधून 'कट अँड पेस्ट' तंत्राचा वापर करून नवीन पेपर तयार करतात. 'सायजेन' आणि 'मॅथजेन' या संगणक निर्मित प्रणाली आहेत. यात काही शब्द दिले की लगेच काही सेकंदांत संगणक विज्ञान आणि गणित या विषयांचे पेपर तयार मिळतात; परंतु यात बरेच पेपर निरर्थक असतात.

इंटरनेटवरून अशा कंपन्या सहज शोधता येतात. रशियन, इराणी आणि चिनी रिसर्च पेपर मिल्स संशोधकांना शेकडो लेखांमध्ये सह-लेखकत्व खरेदी करण्याचा पर्याय देते. अनेक पेपर्स लिलावासाठी उपलब्ध असतात. या वेबसाइटवरून एखादी व्यक्ती रिसर्च पेपर खरेदी करू शकते आणि विकतेसुद्धा. पेपर मिल्सद्वारे तयार केलेले शोधनिबंध ओळखण्यासाठी तज्ज्ञांनी बऱ्याच युक्त्या शोधून काढल्या आहेत. यावर पुढील संशोधन चालू आहे. 'नेचर' या सुप्रसिद्ध विज्ञान मासिकासाठी काम करणाऱ्या पत्रकार होली एलिस यांच्या मते मशीनद्वारे तयार केलेले बनावट रिसर्च पेपर्स शोधणे खूप कठीण आहे; परंतु त्यातील असंबद्ध वाक्यरचना, अर्थहीन मजकूर, अशास्त्रीय भाषा, ग्राफिक्सचे डुप्लिकेशन, शंकास्पद पीअर-रिव्ह्यू प्रक्रिया याच्या अभ्यासानंतर हे पेपर ओळखता येतात. अनेक परिषदांमधून असे पेपर्स स्वीकारले जातात. असे पेपर संपादकांच्या नजरेतून सुटतात व प्रसिद्धही होतात; परंतु लक्षात आणून देताच मागे घेतले जातात.

एलिझाबेथ बिक यांनी चीनमधील पेपर मिल्समधील चारशेहून अधिक पेपरची यादी तयार केली. प्रयोगशाळेत 'वेस्टर्न ब्लॉट' चाचणी केल्यानंतर मिळणाऱ्या छायाचित्रांसारख्या प्रतिमा संगणकाद्वारे नक्कल करून तयार केलेल्या त्यांना त्यात आढळल्या. या चाचणीचा उपयोग विषाणूंमुळे होणाऱ्या 'एचआयव्ही'सारख्या रोगांचे निदान करण्यासाठी होतो; तसेच या चाचणीने विशिष्ट प्रथिने शोधण्याची एक पद्धत आहे, जी फक्त प्रयोगशाळेतच केली जाते. मात्र, पेपर मिल्सने याची भ्रष्ट नक्कल करून हुबेहूब छायाचित्रे संगणकाच्या मदतीने तयार केली. याचा संशोधनावर विपरीत परीणाम होऊ शकतो म्हणूनच बिक यांनी शोधलेले बरचसे पेपर्स प्रकाशकांनी मागे घेतले. परंतु अशी छायाचित्रे शोधणे अत्यंत जिकारीचे आहे. बिक प्रत्यक्ष डोळ्यांनी व संगणकप्रणाली वापरून अशी छायाचित्रे शोधतात.

या विषयातील अमेरिकी तज्ज्ञ ब्रायन आणि क्रिस्टोफर यांच्या अभ्यासाअंती लक्षात आले, की पेपर्स मिल्स विश्वासार्ह जर्नल्समधील पेपरचे डिझाइन नकली पेपर्स तयार करण्यासाठी करतातच, परंतु मायक्रोग्राफ, छायाचित्रे, स्कॅटर प्लॉट, बार आलेख, स्टॉक प्रतिमा आणि संख्यात्मक डेटा सेटचा गैरवापर करतात. हे नकली पेपर्स तंतोतंत उत्तम पेपर्ससारखेच दिसतात. त्यामुळे त्यांना ओळखणे खूप अवघड असते. इतर तज्ज्ञ मंडळींनी व्याकरण्यातल्या चुका व असंबद्ध वाक्ये असलेले पेपर मिल्सने तयार केलेले व दर्जेदार जर्नल्स मधून प्रसिद्ध झालेले अनेक रिसर्च पेपर्स शोधून काढले आहेत.

भारतात अशा पेपर मिल्स अस्तित्वात आहेत. पीएचडी ही शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी आहे; परंतु या साठीचा प्रबंध विकत घेणे सर्रास होते. २००६पासून आणि विशेषतः भारतातील सहाव्या वेतन आयोगानंतर प्रिडेटरी जर्नल्स, डॉक्टरेट अभ्यासाची गुणवत्ता आणि भारतातील संशोधन यावर वाद होत आहेत. प्रबंधाबरोबरच अनिवार्य असलेल्या संशोधन पेपरही (अलीकडे ही अट काढून टाकण्यात आली आहे) भारतातील पेपर मिल्स करतात. असे चुकीच्या संशोधनाचे उत्पादन व त्याचे प्रकाशन शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रेडिमेड प्रकल्पांच्या मागणीतून सुरू होते. रशियन पेपर मिलच्या वेबसाइटवर भारतातून पेपर्सची खरेदी-विक्री होते, हे अत्यंत खेदजनक आहे.

पेपर मिलच्या अनैतिक प्रथेच्या उच्चाटनासाठी जगभर प्रयत्न चालू आहेत. भारतात संशोधनातील फसवणूक ओळखण्यास सक्षम तज्ज्ञ तयार करण्यासाठी नवीन प्रशिक्षण व जागरूकता कार्यक्रम युद्धपातळीवर आवश्यक आहेत. संशोधन करताना जमा केलेली माहिती सर्वांसाठी खुली ठेवण्यासाठी; तसेच पेपर मिलद्वारे केलेले तयार पेपर्स उघड करण्यासाठी ऑनलाइन मंचाची आवश्यकता आहे. यामुळे या प्रकाराला आळा बसेल. असे त्वरित न झाल्यास मात्र पुढील पिढ्यांची संशोधनाबाबत घोर दिशाभूल होत राहील.