Monday, March 28, 2022

'फार्मासिस्ट' होण्यासाठी आता एक्झिट एक्झाम

 Source:  https://maharashtratimes.com/career/career-news/diploma-in-pharmacy-exit-exam-to-be-conducted-for-registration-for-pharmacist-after-dpharm/articleshow/90410887.cms

राज्यात मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी बारावीनंतरचा 'एमएसबीटीई'चा डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला राज्य फार्मसी कौन्सिलकडून नोंदणीद्वारे मान्यता मिळते. ही मान्यता मिळवण्यासाठी विद्यार्थी डिप्लोमाचे प्रमाणपत्र कौन्सिलकडे जमा करतात. त्यानंतर त्यांना मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी नोंदणी क्रमांकासह मान्यता मिळते. मात्र, आता 'डिप्लोमा इन फार्मसी' अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन' द्यावी लागणार आहे.

फार्मासिस्ट होण्यासाठी आता 'डिप्लोमा इन फार्मसी' अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन' (diploma in pharmacy exit exam ) द्यावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय त्यांना नोंदणी क्रमांक मिळणार नसून, औषधांचे दुकान (मेडिकल स्टोअर) सुरू करता येणार नाही. याबाबतचे राजपत्र केंद्र सरकारने नुकतेच प्रसिद्ध केले असून, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) त्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. ही परीक्षा आगामी शैक्षणिक वर्षात होणार असल्याचे सूतोवाच 'पीसीआय'कडून देण्यात आले आहे.

राज्यात मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी बारावीनंतरचा 'एमएसबीटीई'चा डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला राज्य फार्मसी कौन्सिलकडून नोंदणीद्वारे मान्यता मिळते. ही मान्यता मिळवण्यासाठी विद्यार्थी डिप्लोमाचे प्रमाणपत्र कौन्सिलकडे जमा करतात. त्यानंतर त्यांना मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी नोंदणी क्रमांकासह मान्यता मिळते. मात्र, फार्मासिस्ट म्हणून काम करण्यासाठी त्यांना अधिक कौशल्य आत्मसात करता येण्यासाठी; तसेच औषधांबाबत अधिक माहिती व्हावी, या उद्देशाने परीक्षा घेण्यात येणार आहे. फार्मासिस्ट म्हणून व्यवसाय करताना त्यांना जबाबदारीची जाणीव होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे 'पीसीआय'कडून सांगण्यात आले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय फार्मासिस्ट म्हणून मान्यता मिळणार नाही. सध्या अस्तित्वात असणाऱ्या फार्मासिस्टना ही परीक्षा देण्याची आवश्यकता नसल्याचे राजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेचा उद्देश, परीक्षेची वारंवारिता, परीक्षा आयोजनाची प्रक्रिया, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर फार्मासिस्ट आदींबाबतची माहिती 'डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन रेग्युलेशन २०२२' या अंतर्गत स्पष्ट करण्यात आले आहेत.

परीक्षेचे स्वरूप कसे राहणार?

- परीक्षेत तीन पेपर असतील; कालावधी तीन तासांचा राहील.

- परीक्षा इंग्रजी माध्यमातून होईल.

- फार्मास्युटिक्स, फार्माकॉलॉजी, फार्माकॉग्नसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, फार्मास्युटिकल ज्युरीस्प्रुडन्स, ड्रग स्टोअर मॅनेजमेंट या विषयांवर प्रश्न एमसीक्यू पद्धतीने विचारण्यात येतील.

- परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये ५० टक्के गुण मिळवावे लागतील.

- सर्व पेपर एकाच वेळी उत्तीर्ण व्हावे लागतील.

- परीक्षा कितीही वेळा देता येईल.

'डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन'ची अंमलबजावणी कधीपासून करावी, परीक्षा कोणी घ्यावी, परीक्षेचे सविस्तर स्वरूप ठरवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. या समितीचा अहवाल आल्यानंतर, प्रत्येक जबाबदारी निश्चित करण्यात येईल. त्यानंतर परीक्षेबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाईल. येत्या डिसेंबरपूर्वी परीक्षा होईल, असे नियोजन करण्यात येत आहे.

 - डॉ. प्रमोद येवले, प्रभारी अध्यक्ष, पीसीआय


डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 'एक्झिट एक्झामिनेशन'ची माहिती व्हावी, या उद्देशाने 'एमएसबीटीई'ने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परीक्षेबाबतची सर्व प्रक्रिया 'पीसीआय'कडून करण्यात येईल.

 - डॉ. महेंद्र चितलांगे, सचिव, एमएसबीटीई